गोंड राजवटीतील वास्तुकलेचा विकास : एक ऐतिहासिक अभ्यास

Main Article Content

गणेश मादी आत्राम, नरेश एम. मडावी

Abstract

मध्य भारताच्या इतिहासामध्ये गोंड राजवटीला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यविषयक दृष्टीने महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. गोंड सत्तेचा विस्तार आजच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि लगतच्या प्रदेशांमध्ये विविध राजकीय केंद्रांच्या माध्यमातून झाला. गढा-मंडला, देवगड आणि चांदा ही गोंड सत्तेची प्रमुख केंद्रे होती. या राजवटींच्या विकासाबरोबरच किल्ले, राजवाडे, तटबंदी, प्रवेशद्वारे, मंदिरे, जलरचना, समाधीस्थळे आणि प्रशासकीय वास्तू यांचा विकास झाल्याचे ऐतिहासिक व पुरातत्त्वीय साधनांवरून दिसून येते. गोंड वास्तुकलेचे वैशिष्ट्य केवळ स्वतंत्र स्थापत्यशैली निर्माण करण्यात नसून स्थानिक भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध बांधकाम साहित्य, संरक्षणाची गरज, जलव्यवस्थापन, धार्मिक श्रद्धा आणि तत्कालीन राजकीय संपर्क यांचा वास्तुरचनेवर झालेला परिणाम यात आहे. गढा-मंडला प्रदेशामध्ये संग्रामशाहाच्या काळात राज्यविस्तारासोबत किल्ल्यांचे जाळे विकसित झाले. ऐतिहासिक परंपरेनुसार संग्रामशाहाच्या राज्याशी बावन्न गडांचा संबंध जोडला जातो. चौरागड, मदनमहल, सिंगौरगड आणि रामनगर परिसरातील वास्तू या राजकीय व संरक्षणात्मक व्यवस्थेचे महत्त्वपूर्ण अवशेष आहेत. देवगडच्या किल्ल्याची रचना डोंगर, दऱ्या, वनप्रदेश आणि जलसाठ्यांचा उपयोग करून करण्यात आली होती. महाराष्ट्रातील चांदा अर्थात आजच्या चंद्रपूर परिसरात गोंड राजांनी मजबूत तटबंदी, प्रवेशद्वारे आणि राजकीय वास्तूंची उभारणी केली. चांदा नगराची तटबंदी आणि तिच्याशी संबंधित वास्तू गोंडकालीन नगररचनेचे महत्त्वपूर्ण उदाहरण मानता येते. या संशोधनात गोंडकालीन वास्तुकलेचा विकास राजकीय इतिहासाच्या संदर्भात समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संशोधनासाठी पुरातत्त्वीय अहवाल, जिल्हा गॅझेटिअर, भारत सरकार व राज्य शासनाच्या संकेतस्थळांवरील माहिती, ऐतिहासिक ग्रंथ, संशोधनपर पुस्तके आणि उपलब्ध शैक्षणिक साहित्य यांचा दुय्यम साधन म्हणून वापर करण्यात आला आहे. अभ्यासातून असे स्पष्ट होते की गोंड वास्तुकला ही स्थानिक भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेतलेली, संरक्षणाभिमुख, जलस्रोतांशी संबंधित आणि विविध सांस्कृतिक प्रभाव स्वीकारणारी वास्तुपरंपरा होती. या वास्तूंचे संवर्धन हे केवळ पुरातत्त्वीय दृष्टीने नव्हे तर मध्य भारताच्या सांस्कृतिक इतिहासाच्या पुनर्वाचनासाठीही आवश्यक आहे.

Article Details

Issue
Section
Articles