गोंदिया जिल्ह्यातील चर्मकार समाजाचे सामाजिक परिवर्तन : समाजशास्त्रीय अध्ययन
Main Article Content
Abstract
प्रस्तुत संशोधनलेखात गोंदिया जिल्ह्यातील चर्मकार समाजामध्ये घडत असलेल्या सामाजिक परिवर्तनाचे दुय्यम तथ्यसामग्रीच्या आधारे समाजशास्त्रीय विश्लेषण करण्यात आले आहे. चर्मकार समाजाचा परंपरागत चर्मोद्योग, जातिव्यवस्थेतील स्थान, शैक्षणिक प्रगती, व्यवसायातील बदल, आर्थिक नियोजन, राहणीमान, स्त्रियांची स्थिती, राजकीय सहभाग आणि सामाजिक प्रतिष्ठा या प्रमुख आयामांचा अभ्यास करण्यात आला. यासाठी भारताची जनगणना २०११, गोंदिया जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५, महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाची सांख्यिकी, जिल्हानिहाय अनुसूचित जातींची माहिती आणि गोंदिया जिल्ह्यातील ४०० चर्मकार उत्तरदात्यांच्या पूर्वी संकलित सर्वेक्षणाचे पुनर्विश्लेषण करण्यात आले. गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या १३,२२,५०७ असून त्यापैकी १,७५,९६१ व्यक्ती अनुसूचित जातींतील आहेत. जिल्ह्यातील अनुसूचित जातींचे प्रमाण १३.३ टक्के आणि त्यांचा साक्षरता दर ८७.२ टक्के आहे. पूर्वीच्या चर्मकार-केंद्रित सर्वेक्षणानुसार ८५ टक्के उत्तरदाते भविष्यासाठी आर्थिक तरतूद करतात, ९० टक्के उत्तरदात्यांना आधुनिक स्वरूपाचे विक्रीकेंद्र सुरू करण्याची इच्छा आहे, तर ९७.५ टक्के उत्तरदात्यांच्या मते ग्रामीण भागातील पारंपरिक चर्मव्यवसाय लोप पावत आहे. मतदानातील सहभाग लक्षणीय असला, तरी राजकीय पक्षांवरील अविश्वास, अपुरी प्रतिनिधित्वक्षमता, जातीय अवमान आणि व्यवसायातील असुरक्षितता कायम असल्याचे दिसून आले. अध्ययनातून असे स्पष्ट होते की शिक्षण, आरक्षण, नागरीकरण, तंत्रज्ञान आणि व्यवसायवैविध्यामुळे चर्मकार समाजाच्या भौतिक जीवनात बदल झाला आहे; मात्र सामाजिक पूर्वग्रह, जातीय दर्जा आणि प्रतिष्ठाविषयक अभौतिक परिवर्तन तुलनेने मंद आहे. त्यामुळे चर्मकार समाजातील परिवर्तन हे व्यापक असले तरी ते असमान, अपूर्ण आणि सांस्कृतिक विलंबाने प्रभावित झालेले आहे.