"चंद्रपूर जिल्ह्यातील लघु उद्योजकांच्या विपणन व्यवस्थापनातील आव्हाने आणि संधी"
Main Article Content
Abstract
चंद्रपूर जिल्ह्यातील लघुउद्योजक स्थानिक अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असले तरी त्यांच्या व्यवसायाच्या विस्तारात विपणन व्यवस्थापनाशी संबंधित अनेक अडचणी प्रकर्षाने आढळून येतात. प्रस्तुत अध्ययनामध्ये जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांमधून निवडलेल्या 150 लघुउद्योगांच्या प्राथमिक माहितीनुसार विपणनातील विविध अंगांचा (किंमत-निर्धारण, प्रचार-वितरण, स्पर्धात्मकता, ग्राहकसंबंध, बाजार-माहितीचा अभाव, तांत्रिक साधनांचा वापर, वाहतूक आणि बाजार-जाळ्याची मर्यादा) सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. अध्ययनातून हे स्पष्ट झाले की मोठ्या उद्योगसंस्थांच्या वर्चस्वामुळे लघुउद्योजकांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंमत-निर्धारणात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती, जाहिरात व डिजिटल प्रचाराविषयी अपुरी जाण, अपुऱ्या वाहतूक-सुविधा, ग्राहकांची अपेक्षा व बाजार-कलांविषयी मर्यादित माहिती, तसेच ई-विपणन व ऑनलाइन उपस्थितीचा अभाव या समस्या विशेषत्वाने जाणवतात. याशिवाय, सांख्यिकी विश्लेषणानुसार विपणन संसाधनांची कमतरता व स्पर्धेची पातळी या दोन्ही घटकांचा विपणन व्यवस्थापनाशी निगडित समस्यांवर लक्षणीय परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. या निष्कर्षांवरून चंद्रपूर जिल्ह्यातील लघुउद्योजकांना प्रभावी विपणन कौशल्य, डिजिटल साधनांचा वापर, बाजार-विश्लेषण, तसेच वितरण-जाळ्याची बळकटी यांची तीव्र गरज असल्याचे दिसून येते. शासन, वित्तीय संस्था, प्रशिक्षण केंद्रे आणि स्थानिक उद्योजक संघटनांनी परस्परसहकार्याने योग्य प्रशिक्षण, बाजार-संलग्नता, तांत्रिक सुविधा आणि प्रचारधोरणांची उपलब्धता करून दिल्यास लघुउद्योजकांची स्पर्धात्मकता, बाजारातील टिकाव आणि सर्वांगीण व्यवसायविकास अधिक परिणामकारकरित्या साध्य होऊ शकतो.